इस्लामाबाद – पाकिस्तानची अर्थव्यवस्था डळमळली असून त्यांचे सरकार ती रुळावर आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. मंगळवारी एका मंत्र्याने देशाची अर्थव्यवस्था मार्गावर आणण्यासाठी चहाचे सेवन कमी करण्याचे आवाहन पाकिस्तानी नागरिकांना केले. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे.
पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री एहसान इक्बाल यांनी माध्यमांशी बोलताना देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी नागरिकांना एक कप चहा कमी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या विधानाचे व्हिडिओ फुटेज काही वेळातच व्हायरल झाले असून त्यावर नेटकरी पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांची थट्टा उडवत आहेत. देशाच्या आर्थिक समस्या केवळ चहा पिणे कमी केल्याने सुटणार आहेत का, अशी शंका अनेकांनी मांडली आहे. तर, अनेकांनी मंत्र्यांना सिगारेट कमी करण्याचे आवाहन केले आहे.
चहाची आयात करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान जगात वरच्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी येथे ६०० दशलक्ष यूएस डॉलर्स एवढ्या किंमतीचा चहा आयात केला गेला. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे ४६.८१ अब्ज रुपये इतकी होते. त्यामुळेच एहसान इक्बाल यांनी नागरिकांना ही विनंती केली आहे. सध्या आपला देश चहा उधारीवर खरेदी करत आहे. प्रत्येकाने रोज काही कप चहा कमी केला, तर देशाच्या आयात बिलात मोठी कपात होईल, असे एहसान इक्बाल म्हणाले.
दरम्यान, पाकिस्तानात इंधन आणि विजेचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे इस्लामाबादमध्ये रात्री १० नंतर लग्न समारंभांवर बंद घालण्यात आली आहे. ८ जूनपासून हे नवे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच रात्री साडेआठनंतर बाजारपेठा सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.