सिंधुदुर्ग – वेंगुर्लेमधील चिपी विमानतळाच्या धावापट्टीवरून कोल्ह्यांना पळवण्यासाठी स्पीकरवरून वाघाच्या डरकाळ्यांचा आवाज काढण्यात येत आहे. मात्र ही युक्ती वापरून कोल्ह्यांना पळवण्यात कितपत यश येईल हे आता पाहावे लागेल.
चिपी विमानतळ सुरू झाल्यानंतर काही दिवस होत नाही, तोपर्यंत नवीन समस्या उभी राहिली. कोल्हे सतत धावपट्टीवर येतात. यामुळे लॅण्डिंग आणि टेक-ऑफ करताना अडथळे येतात. त्यांना पकडण्यासाठी वनविभागाने अनेकवेळा प्रयत्न केले. आताही या परिसरात कोल्ह्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. मात्र कोल्हे पिंजर्यामध्ये न जाता चकवा देत विमानतळ परिसराच्या बाहेरील भागात वावरताना दिसतात. या कोल्ह्यांना पळवून लावण्यासाठी विमान येण्याअगोदर काही काळ ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून वाघाचा आवाज विमानतळाच्या धावपट्टी परिसरात लावला जात आहे.