बीजिंग – भारताचा शेजारी देश असलेल्या चीनमधील जंगलात आता ‘नवे जग’ सापडले आहे. हे ‘नवे जग’ म्हणजे एक महाकाय विवर असून या विवरात अनेक गुपिते बसलेली आहेत. चेन लिक्सीन नावाच्या एका शास्त्रज्ञाने स्वतः आपल्या सहकाऱ्यांसोबत या नव्या जगात प्रवेश करून तेथील काही माहिती बाहेर आणली आहे. ६३० फुटाच्या या विवरात १३० फुट उंचीची झाडे असून ही झाडे जमिनीकडे झुकल्याने तिथे आजपर्यंत सूर्यप्रकाशही पोहोचलेला नाही.
हे ‘नवे जग’ म्हणजे चीनच्या ले काउंटी जंगलात लपलेले महाकाय विवर आहे. ६३० फुटाचे विवर असून स्थानिक लोक त्याला शेनयिंग तियान्शिंग अये म्हणतात. या विवरात आतापर्यंत कोणीही गेलेले नव्हते पण चेन लिक्सीन नावाचा चीनचा शास्त्रज्ञ तिथे पोहचला होता. ६ मे रोजी चेन हा आपल्या टीमसह या महाकाय खड्ड्यात शिरून परत आला. त्याने दिलेली माहिती अशी की, हे विवर ४९० फुट रुंदीचे आहे. त्यात १३० फुट उंचीची झाडे आहेत. ही झाडे जमिनीकडे झुकलेली असल्यामुळे या विवरात सूर्यप्रकाश पोहचलेला नाही. या परिसरात अशी किमान ३० विवरे सापडली आहेत. इथल्या महाकाय विवरामध्ये झाडांच्या नवीन प्रजाती आढळून येतात. त्याची मानवाला आजपर्यंत काहीच माहिती नाही. हे विवर म्हणजेच खड्डे कसे तयार झाले असावेत याबाबत अद्याप ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र एका सिद्धांतानुसार, पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक पर्वत आत बुडाले असावेत. त्यानंतर तिथे अशी विवरे म्हणजे खड्डे तयार झाले असावेत. तरीही सध्या या ‘नव्या जगा’बाबत संशोधन सुरू आहे. चेन या शास्त्रज्ञाच्या टीमने तीन वेगवेगळ्या मार्गांनी या विवरात आत जाऊन तिथे अनेक फोटो काढले आहेत.