चेन्नई – कर चुकवेगिरीच्या संशयावरून प्राप्तीकर विभागाने आज सकाळपासून एमजीएम समूहाच्या ३० ठिकाणच्या मालमत्तांवर छापे घातले. चेन्नईत या समूहाचे मुख्यालय आहे. या छाप्यांत संशयित व्यवहार सापडले असून आयकर विभागाने कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
एमजीएम हा तामिळनाडूतील एक मोठा उद्योग समूह आहे. लॉजिस्टिक, डिस्टिलरीज, हॉस्पिटॅलिटी, थीमपार्क आणि ट्रेडिंग अशा क्षेत्रांत तो कार्यरत आहे. कर्नाटकातही या कंपनीचा व्यवसाय चालतो. त्यांनी कर चुकल्याचा संशय आयकर विभागाला होता. त्यामुळे आज सकाळी एमजीएम समूहाशी संबंधित ३० ठिकाणांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी घातल्या. त्यात समूहाचे बडे अधिकारी आणि संचालकांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. कंपनीचे संचालक व अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची झडती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली. चेन्नई आणि बंगळुरू येथे कंपनीची मोठी कार्यालये आहेत. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.