नवी दिल्ली – भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
भाजप मुख्यालयात पार पडलेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. याआधी या पदाच्या निवडणुकीसाठी सुरेश प्रभू, मुख्तार अब्बास नक्वी या नावांची चर्चा होती. मात्र जगदीप धनखड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जुलै असून 6 ऑगस्टला मतदान होणार आहे.