जबलपूर – मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील न्यू लाईफ मल्टिस्पेशालिस्ट या खासगी रुग्णालयाला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत 10 रुग्णांचा रुग्णालयातच होरपळून मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख आणि जखमींना 50 हजारांची मदत त्यांनी जाहीर केली. आज सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास न्यू लाईफ मल्टिस्पेशालिस्ट या खासगी रुग्णालयाला अचानक भीषण आग लागली. आग लागली त्यावेळेस रुग्णांसह कर्मचारी वर्ग रुग्णालयात उपस्थित होता. आग लागल्याचे समजताच रुग्णांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीमुळे धुराचे काळे लोट परिसरात दूरवर पसरले होते.