नवी दिल्ली- देशातील वेरूळ आणि खुजराहो या ऐतिहासिक पर्यटन स्थळांवर विकलांग व्यक्तींच्या सोयीसाठी लिफ्ट बसवण्याची परवानगी भारतीय पुरातत्त्व विभागाने दिली आहे. अशा प्रकारचा देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. वेरूळच्या १६ क्रमांकाच्या लेणीत लिफ्ट बसवण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे, असे औरंगाबाद पुरातत्व विभागाचे अधीक्षक मिलनकुमार चावले यांनी सांगितले. यामुळे अपंग पर्यटकांना लेणी जवळून पाहता येतील.
वेरूळ व खुजराहोतील लेणी जागतिक वारसा स्थळांमध्ये येतात. त्यामुळे तेथे अनेक बाबींवर निर्बंध आहेत. गेल्या काही वर्षांपासून वेरूळ लेण्यांमध्ये लिफ्ट बसवण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. पुरातत्त्व विभाग त्याला मंजुरी देत नव्हता. तथापि अपंग पर्यटकांच्या सोयीसाठी लिफ्ट आवश्यक असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने दोन्ही ठिकाणी लिफ्टला परवानगी दिली आहे. शिवाय वेरूळमध्ये पर्यटकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची सोय केली आहे. त्याचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनी होण्याची शक्यता आहे. बॅटरीवरील वाहनांच्या सेवेचा दिवस ठरला नसला तरी या महिन्यात ती सुरू होणार आहेत. याशिवाय अपंग व्यक्तींसाठी तिथे लिफ्ट बसवली जाणार आहे. ती किती व्यक्तींच्या क्षमतेची असेल यावर अद्याप निर्णय झालेला नाही. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.