मुंबई : मुंबईतील खार परिसरात असणाऱ्या भगवती हाइट्स या इमारतीत ३१ डिसेंबर २०२० च्या नववर्षाच्या पार्टीत जान्हवी कुकरेजा या १९ वर्षांच्या तरुणीची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी श्री जोगधनकरचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर यावर सुनावणी झाली. याप्रकरणात जान्हवीची बालमैत्रीण दिया पडळकर आणि जान्हवीचा प्रियकर श्री जोगधनकर यांच्यावर जान्हवीची हत्या केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपत्रात या दोघांनी मिळून जान्हवीची हत्या केल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे. ही हत्या झाली तेव्हा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी न्यायवैद्यक अहवाल, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी पार्टीत उपस्थितांचे जबाब, त्यातून समोर आलेले परिस्थितीजन्य पुरावे आरोपींचा दोष सिद्ध करण्यास पुरेसे आहेत, असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, १९ वर्षीय जान्हवी कुकरेजा ही मानसशास्त्र शाखेची विद्यार्थिनी होती. खार येथील भगवती हाईट्स इमारतीच्या गच्चीवर तिच्या मित्रांनी थर्टा फर्स्टनिमित्तानं आयोजित केलेल्या पार्टीत ती आपली बालपणीची मैत्रीण दिया आणि प्रियकर श्री जोगधनकरसोबत सहभागी झाली होती. तिथं उपस्थितांसह हे तिघेही त्यावेळी मद्याच्या नशेत होते. पार्टी दरम्यान श्री याला बालमैत्रिण दियासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर जान्हवी अस्वस्थ झाली. याच मुद्यावरून तिघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर तिघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झालं. अचानक श्री, दिया यांनी मिळून जान्हवीला अमानुष मारहाण सुरू केली. आणि त्यातच जान्हवीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर केलेल्या तपासणीत जान्हवीच्या शरीरावर मारहाणीच्या, फरफटत नेल्याच्या आणि भिंतीवर आपटल्याच्या एकूण ४८ जखमा आढळल्या.