मुंबई – केंद्र सरकारने अन्नधान्य आणि खाद्यान्नावर पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. संपूर्ण देशातील व्यापाऱ्यांनी आज देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये राज्यातील अन्नधान्य व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. पाच टक्के जीएसटी लावल्यामुळे तांदूळ, गूळ, डाळ, गहू, गव्हाचे पीठ, तृणधान्य, मखाना ,राई, बार्ली, पनीर, दहीतसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत.
राज्यातील घाऊक बाजारपेठ आज बंद करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. कल्याण एपीएमसी मार्केट मधील कल्याण होलसेल मर्चंट असोसिएशन आणि ओम शिवम वेल्फेअर असोसिएशनने देखील आंदोलनाला पाठिंबा दिला असून आज हे मार्केट बंद आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केट तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली खामगाव बाजारपेठ यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे.
सोलापुरातल्या भुसार अडत व्यापारी संघाने देखील आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारलेला आहे. कोल्हापुरा आणि इंदापूर, जळगाव शहरातील शंभरहून अधिक व्यापारी सहभागी झाले होते. सांगली मार्केट यार्डसह जिल्ह्यातील सर्व मार्केट यार्ड बंद ठेवण्यात आलेत.
२८-२९ जून रोजी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत अन्नधान्या आणि खाद्यपदार्थ यांच्यावर पाच टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सदर निर्णयांची अंमलबजावणी १८ जुलैपासून होणार असून त्यामुळे महागाई वाढणार आहे. शेतकरी, छोटे व्यापारी, सामान्य नागरिक यांना या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार आहे.