शिर्डी- केंदरातील भाजप सरकार हे संवैधानिक व्यवस्था रोज मोडीत काढून देशाची मालमत्ता विकणं या पद्धतीने देश संपवण्यासाठी ते निघाले आहेत’ अशी टीका कॉंग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर केली आहे. तसंच, महाराष्ट्रात सातत्याने राज्यसभेची निवडणूक परंपरेनं बिनविरोध झाली आहेत. मतदान संख्येच्या स्पष्टतेवर असते. जेवढी चादर तेवढेच पाय पसरावे, असा टोलाही पटोलेंनी भाजपला लगावला.
कॉंग्रेस वर्किंग कमेटीमध्ये झालेल्या निर्णयाची अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून शिर्डीत दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा सध्या सुरू आहे. कॉंग्रेसचा देश हिताचा संदेश राज्यातील सर्व सामान्य व्यक्ती पर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा स्तरावर 75 किमीची पदयात्रा होणार आहे. केंद्रातील भाजपच्या सरकारची अत्याचारी, हुकुमशाही व्यवस्था, हिटलरशाही प्रवृत्ती दर्शन महाराष्ट्रातील जनतेला करुन देण्याच काम यापुढील काळात कॉंग्रेस पक्ष करणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.