मेलबर्न – जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या नोवाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन सरकारने ताब्यात घेतले असल्याचे जोकोविचच्या वकीलांनी सांगितले. शुक्रवारी जोकोविचचा व्हिसा दुसर्यांदा ऑस्ट्रेलियाचे इमिग्रेशन मंत्री अॅलेक्स हॉक यांनी विशेष अधिकाराचा वापर करून रद्द केला होता. या विरूद्ध जोकोविचने पुन्हा एकदा तेथील न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाच्या सुनावणी अगोदर जोकोविचला ऑस्ट्रेलियन सरकारने ताब्यात घेऊन अगोदर तो ज्या स्थलांतरीतांच्या हॉटेलमध्ये रहात होता तेथे त्याची रवानगी करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. आता या प्रकरणी उद्या रविवारी फेडरर न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामध्ये जोकोविचचे ऑस्ट्रेलियन स्पर्धेत खेळणार की नाही याचे भवितव्य ठरणार आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेसाठी वैद्यकिय सवलत मिळाल्यामुळे तो गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियात दाखल झाला होता, तेव्हापासून जोकोविच कायम चर्चेत राहिला. परंतु त्याने केलेल्या कागदपत्रात काही त्रृटी आढळल्यामुळे त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला होता. मग या विरोधात त्याने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायलयाने जोकोच्या बाजूने निकाल देत त्याला व्हिसा देण्याचे आणि त्याचे सामान, पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले होते. परंतु आता सार्वजनिक हित लक्षात घेऊन आणि लसिकरणाच्या बाबत समझोता नाही, अशी भूमिका ऑस्ट्रेलियन सरकारने याबाबत घेऊन इमिग्रेशन मंत्री हॉक यांनी त्याचा व्हिसा पुन्हा रद्द केला. कागदपत्रात चुकीची माहिती दिल्याचे जोकोविचने मान्य केले होते.