जोहान्सबर्ग – येथील सोवेटो टाऊनशिपमधील बारमध्ये मध्यरात्री एका गटाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेत १४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारानंतर आरोपी फरार झाले असून जोहान्सबर्ग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गौतेंग प्रांताचे पोलीस आयुक्त लेफ्टनंट जनरल इलियास मावेला यांनी सांगितले की, आम्हाला मध्यरात्री फोन आला. बारमध्ये गोळीबार झाल्याची माहिती देण्यात आली. बारमध्ये लोक मौजमजा करत होते, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हल्लेखोर आत आले आणि त्यांनी लोकांवर बेछूट गोळीबार सुरू केला. तपास अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. ही घटना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली, असे मावेला यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, या गोळीबारात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला आणि रुग्णालयामध्ये पोहोचल्यावर आणखी एकाचा मृत्यू झाला, तर रुग्णालयात दाखल केल्यानंतर १४व्या व्यक्तीचाही मृत्यू झाला. ज्या बारमध्ये गोळीबार झाला तो परवानाधारक आहे. घटनेच्या वेळी येथे अनेक लोक उपस्थित होते. अचानक हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. मात्र आरोपींच्या गोळीबारामागील हेतू काय होता हे अद्याप समजू शकलेले नाही, असेही मावेला यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या महिन्यात रविवारी पहाटे दक्षिण आफ्रिकेच्या तटीय शहर पूर्व लंडनमधील एका नाईट क्लबमध्ये किमान २१ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या विद्यार्थ्यांचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण मात्र अस्पष्ट होते.