रांची- झारखंडच्या गुमला येथील 2013 च्या बहुचर्चित डायन-बिसाही हत्याकांड प्रकरणात बुधवारी गुमला दिवाणी न्यायालयाने 19 महिलांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायमूर्ती दुर्गेशचंद्र अवस्थी यांनी ही शिक्षा सुनावली. त्यांना प्रत्येकी 25 हजारांचा दंडही झाला आहे. दंड न भरल्यास आणखी 2 वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे.
झारखंडच्या करंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करौंदाजोर तुकुटोली येथील बर्गेनिया इंदवार आणि अग्नेशिया इंदवार यांना 11 जून 2013 रोजी गावकर्यांनी बैठकीला बोलावले. तेथे बर्गेनिया आणि अग्नेशिया यांना चेटकीन असल्याच्या आरोपावरून काठ्यांनी मारहाण केली. त्यात त्या दोघींचा मृत्यू झाला. आपण निर्दोष असल्याचे या दोन्ही महिला वारंवार सांगत होत्या. मात्र त्यानंतरही आरोपींनी त्यांना मारहाण केली. या प्रकरणी बर्गेनियाची मुलगी सेलेस्टीन हिने तक्रार नोंदवली होती. त्यावरून पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंदवून यातील सर्व आरोपींना 12 जूनला अटक केली होती. नंतर त्यांच्या विरोधात गुमला दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला. त्याचा निकाल लागला. त्यात न्यायालयाने 19 महिलांना जन्मठेप आणि प्रत्येकी 25 हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावली.