मुंबई – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सिमरन बुधरूपने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला. सिमरनला सोशल मीडियावर १३ ते १४ वर्षांच्या मुलांनी बलात्काराच्या धमक्या दिल्याचे समोर आले आहे.
‘पंड्या स्टोर’ मालिकेतील ऋषिता या व्यक्तिरेखेमुळे सिमरन नेहमीच चर्चेत असते. इतर कलाकारांप्रमाणे तिला चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो. तिने याबाबत सांगितले, ‘माझ्या व्यक्तिरेखेने ‘पंड्या स्टोर’ मालिकेतील रावी आणि देवमधले नाते तोडले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मला खूप भयानक गोष्टींचा सामना करावा लागला. खूप गलिच्छ भाषेचा वापर करून माझ्याबद्दल बोलले जात होते, मला बलात्कार करून मारून टाकू अशा धमक्या मिळू लागल्या होत्या. खूप चिंताजनक गोष्टी माझ्याबरोबर घडत होत्या. सुरुवातीला मी याकडे दुर्लक्ष केले पण नंतर धमक्यांचे स्वरुप विकृत होत गेले आणि मग मला पोलिसांत तक्रार करणे भाग पडले. पोलीस तपासात कळले की हा एक १३ ते १४ वर्षांच्या मुलांचा ग्रुप होता. माझ्याबद्दलच्या त्या अतिशय घाणेरड्या कमेंट्स वाचून मला जेव्हा कळले की त्या या मुलांनी लिहिल्या आहेत तेव्हा मला फार वाईट वाटले. मलादेखील एक लहान बहीण आहे जी त्यांच्या वयाची आहे पण तिने जर असे काही केले तर मी तिच्यासोबत काय करेन याचा मी विचारही करून शकत नाही. आई-वडील मुलांना अभ्यासात मदत व्हावी म्हणून फोन घेऊन देतात पण मुलं मात्र त्याचा गैरवापर करतात. त्यांना त्या वयात योग्य-अयोग्य कळत नाही आणि मग ते अशा चुका करून बसतात. त्यामुळे पालकांनी मुलांवर लक्ष ठेवायला हवं’, असे सिमरन म्हणाली.