नवी दिल्ली :कांद्याचे दर कोसळलेले असतानां शेतकऱ्यांसाठी टोमॅटोच्या दरात झालेली वाढ एक वरदान ठरत आहे. तर ग्राहकांसाठी मात्र हे दर आता डोकेदुखी झाली असून, खरेदी करताना टोमॅटो भाजीत घालावा की नाही याचा विचार करताना दिसत आहे.
दरम्यान, बटाटे, कांद्यानंतर सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. अवघ्या महिनाभरात टोमॅटोचे भाव दुप्पट-तिप्पट झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी हे वरदान ठरत असतानां ग्राहक मात्र या किमतीमुळे चिंतेत पडला असून, टोमॅटो खरेदी करायचे कि नाही हा विचार करत तो स्वतः लालबुंद झाला असल्याचे चित्र सध्या बाजारात पाहायला मिळत आहे. सध्या देशातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचे भाव १०० रुपये प्रतिकिलोच्या पुढे गेले आहेत. आधीच महागाईने हैराण झालेल्या लोकांसाठी टोमॅटोच्या भाववाढीचा फटका सहन करावा लागतोय. मात्र, दुसरीकडे चांगली बाब म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. महाराष्ट्र हे देशातील एक असे राज्य आहे जिथे टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. तपासात मोठा उत्पादक असूनही पुण्यासह राज्यातील अनेक शहरातील किरकोळ बाजारात टोमॅटोची १००रुपये किलोच्या वर विक्री होत असल्याचे समोर आले आहे. पुणे, नाशिक, नागपूर, अकोला, बारामती आदी शहरांमध्ये टोमॅटोने किलोमागे १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र टोमॅटोचे वाढलेले भाव सध्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहेत. कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अस्वस्थ झाले होते. आता टोमॅटोच्या दराने त्यांचे नुकसान काही प्रमाणात भरून काढले आहे.