कणकवली – कणकवली येथील मनसे कार्यालयात मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खासदार विनायक राऊत आणि आमदार नीतेश राणे यांच्यावर गंभीर आरोप केले. ओसरगाव येथील टोल नाक्याचे कंत्राट मिळविण्यासाठी विनायक राऊत आणि नीतेश राणे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या दोघांनी एका मोठ्या हॉटेलमध्ये टोल ठेका मिळालेल्या कंत्राटदाराची भेट घेतली असल्याचा आरोप उपरकर यांनी केला.
उपरकर म्हणाले, ओसरगाव येथील टोल वसुलीविरोधात सर्वपक्षीयांनी आवाज उठवल्याने टोल वसुली थांबली आहे; मात्र एका बाजूला टोल वसुलीला विरोध करायचा आणि दुसर्या बाजूला टोलचा ठेका मिळवायचा यासाठी खासदार राऊत आणि आमदार राणे प्रयत्न करत आहेत. विनायक राऊत यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये टोल ठेकेदार कंपनीशी वाटाघाटी करून स्वतःला टोल वसुलीचा पोट ठेका मिळण्यासाठी बोलणी केली आहे. तर राणे यांनीही त्या कंपनीबरोबर बोलणी सुरू केली आहेत. त्यामुळे पुढील काळात राणे किंवा राऊत यांना टोलचा ठेका मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. टोलचे कंत्राट कुणालाही मिळाले तरी त्याला आमची हरकत नाही. मात्र टोल नाक्यावर सिंधुदुर्ग पासिंगच्या सर्व वाहनांना टोलमाफी मिळायला हवी. ही मागणी पूर्ण न करता टोल वसुली झाली तर मनसे टोल नाक्यावर पुन्हा आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.