मुंबई- ठाणे जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जिल्ह्याला पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात येणार्या काळू धरणाच्या कामांना गती देण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने 336 कोटी निधी भुसंपादनासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कल्याण मंडणगड-कुशिवली धरणाचे काम वेगाने पूर्ण करावे अशी मागणी यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.
सह्याद्री अतिथीगृहात ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यातील काळू धरणाच्या उभारणीसाठी मुरबाड तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीतील 18 गावे आणि 23 पाड्यांची जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. तसेच वन विभागाची 999 हेक्टर जमिनही या धरणामुळे पाण्याखाली जाणार आहे. या सर्वं जमिनींच्या भुसंपादनासाठी एमएमआरडीएने पहिल्या टप्प्यात 336 कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत. ज्यायोगे भुसंपादन विहित वेळेत पूर्ण होऊन धरणाच्या कामाला गती येईल. काळू धरणातून 1140 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. या धरणाच्या उभारणीमुळे ठाणे, भिवंडी निजामपूर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका या शहरांची भविष्यातील पाण्याची तहान भागवली जाईल असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.