संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

डोंबिवलीत रिक्षा चालकांची मनमानी
शेअर भाडे १३ रूपयांवरून १५ रुपये

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

डोंबिवली- डोंबिवली शहरातील पूर्व भागात असलेल्या गांधीनगर,पी अँण्ड टी कॉलनी आणि गणेशनगर येथील रिक्षाचालकांनी आरटीओचे नियम धाब्यावर बसवीत सरसकट शेअर भाडे दरांत २ रुपयांची परस्पर वाढ केली आहे. त्या आशयाचे बॅनर परिसरात लावत चालक-मालक संघटनेने प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्यास सुरुवात केली. आरटीओला याची कुठलीच कल्पना नाही. माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अनधिकृत फलक वाहतूक पोलिसांनी हटवला मात्र वाढीव भाडे १५ रुपये रिक्षाचालकांनी कमी केले नसून आरटीओ प्रशासन या रिक्षाचालकांवर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था होऊन रिक्षाचा खर्च वाढला आहे. यामुळे शहरातील अनेक रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून वाढीव भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे.आरे गाव, खंबाळपाडा, ठाकुर्ली, चोळेगाव, आजदे पाडा, देसलेपाडा,भोपर,नांदिवली, सागाव, सागर्ली आदी भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या परिसरात जाण्यासाठी रिक्षा चालक प्रवाशांकडून जादा भाडे आकारत आहेत. सरसकट सर्वच रिक्षाचालक हे वाढीव भाडे आकारत नसले तरी काही रिक्षाचालक जादा भाड्याची मागणी करत असून त्याशिवाय प्रवाशांना रिक्षात बसू दिले जात नसल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. आयरे रोड, गांधीनगर, गणेशनगर आणि पी अँण्ड टी कॉलनी,म्हात्रे नगर, तुकाराम नगर आदी परिसरातील रिक्षा चालकांनी शेअर भाडे १३ रुपयांवरून १५ रुपये केले आहे. तशा स्वरूपाचा फलकदेखील रिक्षा थांब्यावर लावला होता. डोंबिवली वाहतूक उप शाखेच्या पोलिसांनी हा अनधिकृत फलक काल संध्याकाळी हटविला. तसेच येथील रिक्षाचालकांना वाढीव भाडे आकारू नका, अशा सूचना केल्याचे वाहतूक पोलिस सांगतात, परंतु त्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवीत आजही चालकांनी प्रवाशांकडून १५ रुपये भाडे घेतले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami