मुंबई – ‘संसार पंढरी आम्ही वारकरी, अगा पांडुरंगा सुखी ठेव सारी’ असे म्हणत सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करत वारकरी पंढरीच्या दिशेने जात आहेत. माऊलींची पालखी आज फलटण येथे मुक्कामी होती. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी निमगाव केतकी मुक्कामी होती. विठूनामाचा गजर करत देहू आळंदीहून प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालख्या मजल दरमजल करत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा निघाला आहे. त्यामुळे वारकर्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने सकाळी अंथुरणेवरून निमगाव केतकीकडे प्रस्थान ठेवले. विठूनामाच्या गजरात 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे देहू आळंदीहून प्रस्थान करण्यात आले. पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन माऊली महाराजांचा पालखी सोहळा आता सातारा जिल्ह्यातून जात आहे. आज ऐतिहासिक फलटण शहरामध्ये माऊली महाराजांची पालखी मुक्कामी होती. दरम्यान, कोरोनामुळे गेली दोन वर्षे वारकर्यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही. त्यांच्या पायी वारीत खंड पडला. मात्र, परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकर्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. दोन वर्षांचा कठीण काळ लोटल्यानंतर यंदा मोठ्या थाटामाटात ही आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक झाले आहेत.