पुणे – महाराष्ट्रामध्ये यंदा कोरोना संकट आटोक्यात असल्याने यंदाची वारी पुन्हा 2 वर्षांनी पंढरपूरला प्रस्थान करत आहे. काही पालख्यांचे मार्गक्रमण सुरू देखील झाले आहे; पण वारीतील प्रमुख आकर्षण असणार्या संत तुकाराम आणि ज्ञानोबा माऊलींची पालखी 20,21 जूनला निघणार आहे. त्यांच्यासाठी तयारी सुरू झाली आहे. दरम्यान संत तुकाराम यांच्या पालखीचा मुक्काम ठिकाणांपैकी इंदापूरमधील मुक्काम ठिकाण आता बदलण्यात आले आहे. नारायणदास हायस्कूल ऐवजी आता तुकोबारायांची पालखी इंदापुरात आयटीआय कॉलेजमध्ये मुक्कामाला असणार आहे. पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख यांनी याचे संकेत दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला देहूमधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. सध्या नव्या ठिकाणासाठी संबंधितांशी बोलणी सुरू आहे आणि जो निर्णय होईल त्याप्रमाणे प्रशासन पुढील तयारी करणार असल्याचं सांगण्यात आले आहे. यंदा पालखीमध्ये महिलांचा समावेश पाहता त्यांच्यासाठी विशेष सोयी-सुविधा उभारल्या जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. आषाढी एकादशी यंदा 10 जुलैला आहे. त्याच्या निमित्त तयारीला सुरुवात झाली आहे. वारकर्यांचा प्रवास सुकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 14 जून रोजी पार पडणार आहे.