थेट प.बंगालहून (भाग १)! पश्चिम बंगाल निवडणूक २०२१ – डालिया मुखर्जी

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

२०२१ मधील विधानसभा निवडणुकींचे वारे वाहू लागल्यामुळे सध्या पश्चिम बंगाल हा देशातील राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू ठरला आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणाच्या इतिहासात प्रथमच ‘गोमाता’ प्रदेशातील एक भगवा पक्ष बंगालमधील सत्ताधारी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या डावी आघाडी आणि काँग्रेस युतीसमोर मोठे आव्हान उभे करत आहे. ईशान्य भारतातील डाव्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या त्रिपुरात भाजपने विजय मिळवल्यानंतर आता बंगालमध्येही ‘हिंदूत्ववादी अजेंडा’ राबविण्यास भाजप सज्ज झालेला दिसतो. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जन्मभूमी असलेले राज्य कला आणि संस्कृतीच्या बाबतीत धर्मनिरपेक्ष असणे ही बाब राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या ‘थिंक टँक’ला नेहमीच जिव्हारी लागत असते. त्यामुळेच यावेळी सत्तेत येण्यासाठी अगदी कोणत्याही पातळीवर जाण्याची भाजपची तयारी आहे. प. बंगालमध्ये निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी, प्रचारात काहीही कमी पडू न देण्याची खबरदारी घेण्यासाठी भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आणि भाजपचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव (संघटना) शिवप्रकाश यांच्यासह भाजपच्या डझनभर उच्चपदस्थ नेत्यांनी दिल्लीहून थेट प. बंगाल गाठले आहे.

ममता बॅनर्जी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली २०११ साली प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता स्थापना झाली. डाव्यांचा गड असणाऱ्या प. बंगालमध्ये तब्बल ३४ वर्षांनी झालेला हा सत्तापालट ऐतिहासिक म्हणावा असाच होता. २०१६ च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या यशाची पुनरावृत्ती झाली. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती करून सिंगूर-नंदीग्राममधील घटनांचा परिणाम म्हणून निर्माण झालेल्या प्रस्थापित सरकारविरोधी लाटेवर स्वार होत ममता बॅनर्जींनी आपला पारंपरिक शत्रू असलेल्या डाव्या आघाडीला नामोहरम केले होते. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत बॅनर्जी यांना डावी आघाडी आणि काँग्रेस यांच्या युतीशी सामना करावा लागला. दीड महिना परस्परविरोधी प्रचाराची कडवी झुंज रंगली होती. वाढता भ्रष्टाचार आणि औद्योगिकीकरणाचा अभाव हे यांत कळीचे मुद्दे होते. या निवडणुकीत भाजप जरी तिसऱ्या स्थानावर असला तरी त्यांनी केलेल्या अप्रत्यक्ष मदतीमुळे डावे आणि काँग्रेस यांच्या युतीला फायदाच झाला होता. ६, मुरलीधर सेन लेन, कोलकाता-७३ या भाजपच्या प्रदेश मुख्यालयातून नारादा न्यूज एजन्सीने केलेली स्टिंग ऑपरेशनची मालिका प्रसिद्ध करण्यात आली. या मालिकेत मुकुल रॉय, शुभेंदू अधिकारी आणि भोभन चटोपाध्याय यांच्यासारखे तृणमूलचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री हे मॅथ्यू सॅम्युअल यांच्याकडून पैसे घेताना दिसत होते. एकूणच, औद्योगिकीकरणाचा अभाव हा मुद्दा मागे पडून भ्रष्टाचार हा ज्वलंत राजकीय मुद्दा बनला. मात्र तरीही ममता बॅनर्जी यांनी आपला प्रभाव आणि लोकप्रियता यांच्या बळावर आपल्या पक्षाला सहज बहुमत प्राप्त करून दिले.

मागील तीन वर्षांत प. बंगालमध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप उदयास आला आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांना मागे टाकत भाजपने ४२ पैकी १८ जागा जिंकल्या. विशेष म्हणजे, या निवडणुकीत नेहमी डाव्यांच्या पारड्यात पडणारी १५ टक्के मते भाजपने स्वत:कडे वळवली आणि डाव्यांना मिळणाऱ्या मतांचे प्रमाण २२.५ टक्क्यांवरून ७.५ टक्क्यांवर आले. अनेक डाव्या समर्थकांनीही भाजपच्या बाजूने मतदान केल्याचे या निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले. भाजपने प. बंगालमध्ये २०१९ ची लोकसभेची निवडणूक भ्रष्टाचार आणि हिंसाचार या दोन मुद्द्यांवर लढवली. आता या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता काबीज करण्याचे शर्थीचे प्रयत्न करत असणाऱ्या भाजपने पश्चिम बंगालमधील २७ टक्के मुस्लीम मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी आपले नेते पाठवले आहेत.

सर्व काही ठरल्याप्रमाणे झाले तर बंगालमध्ये १५ वी विधानसभा निवडणूक मे २०२१ मध्ये पार पडेल. प. बंगालमधील आताची परिस्थिती ही २०१६ च्या निवडणुकीच्या वेळी असणाऱ्या परिस्थितीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तृणमूल काँग्रेसच्या अनेक भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये सहज प्रवेश मिळत असून त्यांना पक्षातील अनेक महत्त्वाची पदे दिली जात आहेत. मुकुल रॉय यांनी २०१६ मध्येच भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले. शुभेंदू अधिकारी यांना संघटनेचे अध्यक्ष बनवण्यात आले आणि शोभन चटोपाध्याय निरीक्षक झाले. आत्तापर्यंत तृणमूल काँग्रेसचे ७, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्यनिस्ट पक्ष आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दिवसागणिक तृणमूल काँग्रेसचे आणि इतर पक्षांचे लहान- मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मात्र, भाजपला अजूनही प. बंगालसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून लोकप्रिय आणि स्वीकारार्ह असा चेहरा जाहीर करता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार त्यांच्या सतत संपर्कात असल्याचा दावा केला होता. भाजपच्या राज्य नेतृत्वानुसार भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तृणमूलच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची संख्या ही तर केवळ हिमनगाच्या टोकावर मोजण्याइतकी आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष म्हणतात, ‘’ तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाचे आमच्या पक्षात स्वागतच आहे.” तृणमूल काँग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांचा समावेश पक्षात करून, त्यांना महत्त्वाची पदे देऊन भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापन करणे शक्य आहे का? असे विचारले असता घोष म्हणाले, ‘’त्यांच्याविरुद्ध असणारे भ्रष्टाचाराचे खटले सुरूच राहतील. त्यांना न्यायालयात स्वतःला निर्दोष सिद्ध करावेच लागेल.’ त्यामुळे या निवडणुकीत भाजप भ्रष्टाचाराच्या मुद्द्याचे भांडवल करणार नाही हे मात्र आता उघड आहे. त्याऐवजी विकास, बंगालची अर्थव्यवस्था, राज्यातील शेतकऱ्यांची दुर्दशा, घुसखोरी आणि घराणेशाही, सीमेपलीकडील तस्करी आणि तृणमूल नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप हे नवे मुद्दे भाजप अधोरेखित करत आहेत.

निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत खदखद वाढत चालली आहे. पक्षातील असंतुष्ट नेते नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. पक्षांतर्गत असंतोष शांत करण्याचा प्रयत्न पक्षनेतृत्वाकडून होत असला तरी त्या प्रयत्नांना फारसे यश मिळालेले दिसत नाही. काहीच पर्याय न उरल्यामुळे आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि डावे – काँग्रेस युतीला एकट्यानेच प्रतिकार करण्याचे ठरवले आहे आणि त्यांनी जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांना भेटून रेंगाळत असलेली कामे मार्गी लावण्याचा सपाटा चालवला आहे. याशिवाय त्यांनी अनेक प्रचारसभांचे आयोजनही केले आहे. राज्य सरकारने आयोजित केलेल्या संगीत सन्मान कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘बंगालची ‘पवित्र माती’ भेदभावाचे राजकारण करणाऱ्यांना कधीच थारा देणार नाही’
दुसरीकडे, धर्मांध भाजपचा आणि भ्रष्ट तृणमूल काँग्रेसचा पराभव करणे शक्य असल्याचा विश्वास डावे आणि काँग्रेस आघाडीला वाटतो आहे. राज्याच्या विविध भागात सभा, मिरवणुका आणि रोड शो आयोजित करून भाजप आणि तृणमूल काँग्रेस हे दोन्ही पक्ष धर्मांध आणि लोकविरोधी आहेत हे पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ‘तृणमूलच्या भ्रष्टाचाराला आणि भाजपच्या धर्मांधतेला बंगालची जनता कंटाळली आहे. ते पर्याय शोधत आहेत. जनतेच्या या सर्व अपेक्षा केवळ काँग्रेस आणि डाव्यांची युतीच पूर्ण करू शकते.’ असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि ममता बॅनर्जींवर कडवट टीका करणारे अधीर रंजन चौधरी म्हणाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सूर्यकांता मिश्रा म्हणातात, ‘राज्याची प्रगती आणि धार्मिक सलोखा या दोन्हीसाठी तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचा पराभव करणे अत्यंत गरजेचे आहे’.

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami