संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

दलित विद्यार्थिनींना गणवेश काढायला सांगितले; यूपीच्या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनौ – उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये एका सरकारी शाळेत शिक्षकांनी दोन दलित विद्यार्थिनींना गणवेश उतरवण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना ११ जुलै रोजी घडली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धौलाना ब्लॉकच्या दहीरपूर गावातील कंपोजिट प्रायमरी स्कूलमध्ये ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दलित विद्यार्थिनींनी शाळेतील दोन शिक्षकांवर आपला गणवेश काढून इतर मुलींना घातल्याचा आरोप केला आहे. दोन्ही विद्यार्थिनींच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, शिक्षक शाळेच्या गणवेशात विद्यार्थिनींचे फोटो काढत होते, मात्र त्यांच्या मुलींचे फोटो काढले नाहीत, उलट त्यादिवशी ज्या मुली गणवेश घालून आल्या नव्हता त्यांना त्यांचा गणवेश देण्यास सांगितले. मात्र या विद्यार्थिनींनी तसे करण्यास नकार दिल्याने त्यांना मारहाण करून शिक्षकांनी जबरदस्तीने त्यांचा गणवेश काढला.’ एका विद्यार्थिनीच्या पालकांनी सांगितले की, ‘याबाबत शाळेला विचारणा केली असता शाळेकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.’ तर, दुसऱ्या विद्यार्थिनीच्या वडिलांनी याबाबत शोषित क्रांती दलाचे अध्यक्ष रविकांत यांच्याकडे तक्रार केली. ‘दोन मुली अनुसूचित जातीच्या असल्यामुळे शिक्षकांनी त्यांच्याबाबत जाणीवपूर्वक हे वर्तन केले. जेव्हा मुलीच्या वडिलांनी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मी हे प्रकरण शिक्षण विभागाकडे नेले आणि शिक्षकांना निलंबित करण्याची विनंती केली’, असे रविकांत यांनी सांगितले.

ही बाब समोर आल्यानंतर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी अर्चना गुप्ता यांनी १३ जुलै रोजी दोन्ही शिक्षकांना निलंबित केले होते. या प्रकरणाचा तपास गटशिक्षणाधिकार्‍यांकडे सोपवला होता. आता याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हापूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणाले, दोन्ही शिक्षकांविरुद्ध कलम ३२३, ५०४, १६६ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच कलम ५०५, ३५५ आणि कलम ३ (२) (व्ही) आणि एससी/एसटी कायद्यान्वये पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, निलंबित केल्यानंतरही हे शिक्षक शाळेत येतात असा पालकांचा आरोप आहे. तर, शिक्षकांचे म्हणणे आहे की, त्यांनी कोणत्याही विद्यार्थ्याबाबत भेदभाव केला नाही. सर्व विद्यार्थ्यांना ११ जुलै रोजी फोटो काढण्यासाठी शाळेचा पूर्ण गणवेश घालून शाळेत येण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र काही विद्यार्थी पूर्ण गणवेशात आलेले नव्हते. त्यामुळे त्यांना गणवेशात असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा गणवेश देण्यास सांगितले. याबाबत पुढे असे काहीतरी घडेल याची कल्पनाही नव्हती. तर दुसऱ्या शिक्षकांनी सांगितले की, त्यांनी कोणत्याही विद्यार्थिनींना मारहाण केली नाही किंवा गणवेश काढण्यास भाग पाडले नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami