संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

दिल्लीच्या हजरत निजामुद्दीनमध्ये रेल्वेकडून जैन फुडची व्यवस्था

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे आता प्रवासादरम्यान प्रवाशांना सात्विक आहार देणार आहे. यासाठी रेल्वे कंपनी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने हजरत निजामुद्दीन स्टेशनवर इस्कॉन मंदिर दिल्ली गोविंदाज रेस्टॉरंट सुरू करण्याची घोषणा केली आहे. प्रवाशांना रुचकर, सात्विक आणि सकस आहार देण्यासाठी आयआरसीटीसीने हा पुढाकार घेतला आहे.

राजधानी दिल्लीतील इस्कॉन मंदिराने गोविंदाज रेस्टॉरंटच्या माध्यमातून ही सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. आयआरसीटीसी ई-कॅटरिंग सेवेद्वारे प्रवासादरम्यान प्रवासी गोविंदाच्या रेस्टॉरंटमधून सात्विक जेवण ऑर्डर करू शकतील. भारतीयांची धार्मिक श्रद्धा लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली आहे. कांदा लसूण न खाणाऱ्या तसेच पूर्ण शाकाहारी भोजन घेणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवासात या सात्विक थाळीचा आस्वाद घेता येणार आहे. या प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन रेल्वे केटरिंग, टुरिझम कॉर्पोरेशनने इस्कॉन मंदिराच्या गोविंदा रेस्टॉरंटबरोबर सहकार्य करार केला आहे. पहिल्या टप्प्यात दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशनपासून ही सेवा प्रवाशांना उपलब्ध करून दिली जात असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभर सुरू केली जाणार आहे. रेल्वेचा प्रवास अधिक अंतराचा असेल तर शुध्द शाकाहारी प्रवाशांना भोजनाची अडचण येते. त्यातही कांदा लसूण न खाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे पँट्री किंवा अन्य ई केटरिंग सेवा यातून उपलब्ध होणाऱ्या पदार्थांच्या शुद्धतेबद्दल खात्री वाटत नाही. आरसीटीसीने देशातील विविध भागात किफायती दरात टूर पॅकेज देणारी ‘देखो अपना देश’ योजना सुरू केली आहे. या माध्यमातून देशातील विविध धार्मिक स्थळांची यात्रा करता येते. या प्रवासात सात्विक थाळी प्रवाशांची मोठीच सुविधा ठरेल, असे रेल्वे अधिकारी सांगतात. या सेवेमध्ये डिलक्स, महाराजा थाळी, पुरानी दिल्ली व्हेज बिर्याणी, नुडल्स, दाल माखनी, पनीरसह अन्य अनेक पर्याय आहेत. थाळीसाठी प्रवाशांना प्रवास सुरू होण्याअगोदर दोन तास ऑर्डर द्यावी लागेल. प्रवाशांना पीएनआर नंबरसह बसल्या जागीच थाळी मिळणार आहे, असे रेल्वेने जाहीर केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami