दुबई – दुबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला. धावपट्टीवर दोन विमानांची टक्कर होता होता वाचली. त्यामुळे दोन्ही विमानांमधील शेकडो प्रवासी सुदैवी ठरले. हा धक्कादायक प्रकार रविवारी ९ जानेवारीला घडला. त्याबद्दल भारताच्या नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने संयुक्त अरब अमिरात विमान प्राधिकरणाकडे अहवाल मागितला आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ९ जानेवारीला रात्री ९.४५ वाजता ईके-५२४ बोईंग ७७७ विमान हैदराबादसाठी उड्डाण करणार होते. या विमानाने टेकऑफ रन सुरू केली. मात्र त्यावेळी वैमानिकाला तात्काळ उड्डाण रद्द करण्यास सांगण्यात आले. कारण त्यावेळी ईके-५६८ अमिरात बोईंग ७७७ हे दुसरे विमान बेंगरूळुरूसाठी उड्डाण करत होते. त्याने रनवे पार केला होता. हैदराबादच्या वैमानिकाने तातडीने विमान थांबवले नसते तर धावपट्टीवर दोन्ही विमानांची टक्कर झाली असती. या विमानांमध्ये शेकडो प्रवासी होते. हा अपघात टळल्याने ते थोडक्यात बचावले. या प्रकाराची आता चौकशी सुरू आहे.