नवी दिल्ली :दररोज आपल्याकडे हजारो लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. अनेकवेळा रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळून येतात. अशावेळी संपूर्ण रेल्वे स्थानक रिकामं करण्यात येत आणि शेवटी ती घातक स्फोटके नसून फक्त फटाक्यासारखे क्रॉकर असल्याचे आढळून येते. या सगळ्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने विचार करता रेल्वे स्थानकांवर आता बॉम्ब शोध यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यासाठी संवेदनशील रेल्वे स्थानके निश्चित करण्यात आली असून, त्यांची सुरक्षा एकात्मिक प्रणालीद्वारे केली जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सात हजार स्थानकांपैकी १९९ स्थानकांवर रेल्वेकडून ३२२.१९ कोटी रुपये खर्च करत आहे. रेल्वे स्थानकावर क्लोज सर्किट टेलिव्हिजन तसेच बॉम्ब शोधण्याच्या यंत्रणेची एकात्मिक सुरक्षा यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रेल्वेने निवडलेल्या संवेदनशील स्थानकांमध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील पंडित दीनदयाळ उपाध्याय, लखनौ, वाराणसी, फैजाबाद, अयोध्या, सहारनपूर, बरेली, मुरादाबाद, गाझियाबाद, आग्रा, मथुरा, झाशी, कानपूर, प्रयागराज, लखनौ आणि गोरखपूर स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितिनुसार,सुरक्षेच्यादृष्टीने चिन्हांकित केल्या गेल्ल्या स्थानकांसाठी सीसीटीव्ही, प्रवासी आणि बॅगेज स्क्रीनिंग सिस्टम आणि बॉम्ब शोध प्रणालीची एकात्मिक सुरक्षा प्रणाली मंजूर करण्यात आली आहे. यासाठी १९४ बॅगेज स्कॅनर, ६९अंडर व्हेईकल स्कॅनिंग सिस्टीम, १२९ बॉम्ब शोधक उपकरणे स्टेशनला देण्यात आली आहेत. त्याचबरोबर स्फोटकांचा शोध आणि ट्रॅकिंगसाठी ४२२ स्निफर डॉग्जही तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय ८६१ रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पाळत ठेवली जाणार आहे.