नवी दिल्ली – मागील काही वर्षात देशात सायबर हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षात देशातील सायबर सुरक्षेत ३६.२९ लाखांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. देशातील वाढते सायबर हल्ले रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना आखल्या जात असल्याचेही त्यांनी यावेळी सभागृहात सांगितले.
लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात मिश्रा म्हणाले, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमच्या अहवालानुसार आणि ट्रॅक केलेल्या माहितीनुसार, २०१९ ते जून २०२२ पर्यंत देशात ३६.२९ लाख सायबर सुरक्षा घटनांचा तपास करण्यात आला. २०१९ मध्ये सुमारे ४ लाख, २०२० मध्ये १२ लाख, २०२१ मध्ये १४ लाख आणि २०२२ मध्ये सुमारे ६.७४ लाख सायबर सुरक्षा घटनांचा तपास करण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भारतात यावर्षी जून महिन्यापर्यंत सायबर सुरक्षेशी संबंधित ६७०,००० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, अशी माहिती अजय कुमार मिश्रा यांनी दिली.