भोपाळ – मध्यप्रदेशच्या सिधी जिल्ह्यात एका तरुणीने चक्क स्वत:ची जीभ कापून देवीला अर्पण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या ही तरुणी रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. तरुणीने अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन हे कृत्य केले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या तरुणीचे वय केवळ २१ वर्ष आहे. तिने असे का केले, याबाबत पोलीस तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी दररोज देवीच्या मंदिरात जायची. तिची देवीवर खुप श्रद्धा असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यातूनच तिने हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. तिचे वडील गावातील प्रसिद्ध हनुमान मंदिराशेजारी असलेल्या देवीच्या मंदिरात गेले होते. तिथे मुलीने आईसोबत पूजा केली आणि नंतर अचानक जीभ कापून देवीच्या पायावर फेकली. तिच्या या कृत्याचे आईलाही आश्चर्य वाटले. दरम्यान, ही घटना सिधी जिल्ह्यातील बारागाव येथे घडली.