धुळे – २०१७-२०१८ मध्ये तत्कालीन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी काही शिफारशी मांडत एक अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार कार्यवाही करण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांना आदेश द्यावेत अशी मागणी करण्यासाठी धुळ्यातील सफाई कर्मचाऱ्यांनी नुकतीच भाजप कामगार आघाडीच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन केली आहे.
यावेळी भाजप आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विजय पवार,प्रदेश कायदे सल्लागार किशोर जाधव,जिल्हाध्यक्ष सुरज अहिरराव,संघटक सरचिटणीस अन्सार हसन,सदस्य हेमंत चौधरी आणि सफाई कामगार प्रतिनिधी हिरालाल डांगोरे ,मानव पवार हे उपस्थित होते.सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी मेहतर ,
वाल्मिकी,सुदर्शन,डोम, दुमार,शेख मेहतर, मेघवाल,रुखी,मखीयार या समाजाच्या मुक्ती व पुनर्वसनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे काही शिफारशी केल्या होत्या.या शिफारशींचा अहवाल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सर्व संबंधीत विभागाने कार्यवाहीसाठी पाठविला होता.पण त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.त्यामुळे या अहवालाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याचे आदेश देऊन सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली आहे.