नंदूरबार – जिल्ह्यातील नवापूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वादझाला.मात्र हा वाद विकोपाला गेला आणि यामध्ये एका कारला आरोपींनी आग लावली.
यावेळी महामार्गावरच पेटती कार पाहताच काही नागरिकांनी आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अग्निशमन दलाला याबाबत कळवले.पण,अग्निशमन दल येईपर्यंत कार आगीत जळून खाक झाली होती. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पिंपळनेर चौफुली जवळ गुजरात राज्यातील ही कार आगीत जळून खाक झाली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ही कार जवळ दोन गटांमध्ये वाद सुरू होता.त्यानंतर कारला आग लावून एकजण घटनास्थळावरून फरार झाला आहे.कारला लागलेल्या आगीची दाहकता बघून शेजारील नयी होंडा परिसरातील नागरिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी दर्पण पाटील, गोविंद मोरे, मनोज बोरसे यांनी नवापूर नगर परिषद अग्निशमन दलाला फोन करून नवापूर पोलिसांनाही माहिती दिली.मात्र अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत कार जळून खाक झाली होती.नवापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे