मुंबई – एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाईचा धडाका लावला आहे. त्यात रोजच कारवाई केली जात आहे. रवींद्र फाटक यांची पालघरच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून शिवसेनेने हकालपट्टी केली आहे. त्याची माहिती आज ‘सामना’तून दिली आहे. पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शहा यांचीही उचलबांगडी केल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड करून ते सुरतला गेल्यानंतर मध्यस्थी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना सुरतला पाठवले होते. त्यावेळी फाटक यांनी शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर तेही शिंदे गटात सामील झाले. रवींद्र फाटक ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. संतोष बांगर यांची हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्यानंतर फाटक यांच्यावर शिवसेनेने कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार तानाजी सावंत यांची सोलापूर जिल्हासंपर्क पदावरून हकालपट्टी केली होती. कोकणातील शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांच्या समर्थकांचीही पक्षातून हाकालपट्टी केली आहे. त्यांचे समर्थक उपजिल्हा युवा अधिकारी केतन शेट्ये आणि युवा तालुका अधिकारी तुषार साळवी यांना शिवसेनेने पदावरून हाकलले आहे. अशाप्रकारे शिवसेनेने बंडखोरांवर कारवाईचा धडाका लावला आहे. सामना या दैनिकातून दररोज कोणाच्यातरी हकालपट्टीची घोषणा केली जात आहे.