नांदेड – पाऊस लांबल्याने नांदेड जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा मृग नक्षत्राला चांगला पाऊस झाला. सलग तीन-चार दिवस पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. जवळपास पन्नास टक्क्यांच्या वर खरीप पेरणी आटोपली आहे पण गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामाचे पेरणीक्षेत्र ७ लाख ४२ हजार हेक्टर आहे. यापैकी यावर्षी ३ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. सोयाबीन १ लाख ८८ हजार हेक्टर आणि कापसाची १ लाख २० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. आतापर्यंत ४९ टक्के पेरणी झाली. गेल्या आठ दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. पाऊस लांबल्याने अनेक शिवारात सोयाबीन आणि कापूस उगवलाच नाही. तर काही भागात पावसाअभावी पिके सुकू लागली आहेत. पाऊस नसल्याने आता शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी सुरू केली आहे. साधारणपणे सोयाबीनला एकरी ७ हजार, तर कापसाला एकरी ६ हजार रुपये खर्च शेतकऱ्यांना येतो. आता पुन्हा तितकाच खर्च करावा लागणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटाच्या गर्तेत आकडत चालला आहे.