नागपूर – कन्हान नदीतील फ्लाय शमुळे जलशुद्धीकरण केंद्रातील सातपैकी चार पंप अजूनही बंद असल्याने पाच दिवसानंतरही काही भागात पाणीपुरवठा सुरू झाला नाही. परिणामी संततधार पावसातही अनेक भागातील नागरिकांना पाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. नळांना पाणी कधी येणार, असा प्रश्न पाणीपुरवठा सुरू न झालेल्या वस्त्यांतील नागरिकांना पडला आहे.
कन्हान नदीत १५ जुलै रोजी खापरखेडा औष्णिक केंद्राची फ्लाय श पुन्हा आढळून आल्याने कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील सातही पंप बंद करण्यात आले होते. आशीनगर, नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज झोनमधील २८ जलकुंभांतर्गत वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा बंद होता. यातील काही वस्त्यांमध्ये दोन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरू झाला. परंतु उत्तर नागपुरातील बुद्धनगर, मॉडेल टाऊन व इतर भागांमध्ये अद्यापही पाणीपुरवठा बंद आहे.