नागपूर – नागपुरात काल रात्रभर पाऊस पडला. दिवसाही पावसाची संततधार कायम होती. पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. नवेगाव खैरी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने धरण पूर्णपणे भरले आहे. या धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून नागपूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो.
दरम्यान, पूरसदृश्य परिस्थिती लक्षात घेता नागपुरातील काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने उत्तर नागपुरातील पिवळी नदीच्या काठावरील घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट शोधावी लागत आहे. तसेच नांद, वेना या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावनेर, पारशिवनी, रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका संभवतो. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. या परिस्थितीत नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये व गरजेनुसार सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा, पाणी वाहत असताना चुकूनही पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.