नागपूर- जुलै महिन्यात थैमान घालत असणार्या पावसाने राज्यातील अनेक भागांत विश्रांती घेतली असून, विदर्भात अजूनही पाऊस सुरू आहे. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. भद्रावती तालुक्यातील चिचोर्डी परिसरात एका शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. तर याच घटनेत अन्य एक जण जखमी झाला आहे. तर दुसर्या घटनेत जीवती तालुक्यात शेडवाही शिवारात वीज कोसळून एका शेतकर्याचा मृत्यू झाला आहे. तर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस हद्दीत वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
उज्ज्वला थुटूरकर असे या महिलेचे नाव आहे. यंदा नागपूर आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकर्यांना बसला आहे. चंद्रपूरमध्ये भद्रावती तालुक्यातील शहरालगत असलेल्या चिचोर्डी शेत शिवारात पाळीव जनावरे चारत असलेल्या शेतकर्यावर वीज कोसळल्याने त्याचा जागीचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत आणखी एक जण जखमी झाला आहे. संजय काशिनाथ चालखुरे (वय 55) असे मृत्यू झालेल्या शेतकर्याचे नाव आहे तर वीज पडल्यामुळे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव विकास डाखरे (वय 22) असे आहे.