नवी दिल्ली – वाढत्या कोरोना रुग्णसंख्येत आज देशातील नागरिकांना काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली. काल, सोमवारी दिवसभरात देशात १३ हजार ०८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर २४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच १२ हजार ४५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. रविवारच्या तुलनेत सोमवारी नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली. रविवारी देशात १६ हजार १३५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, सध्या देशात १ लाख १४ हजार ४७५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
भारतात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच लाखांच्या पुढे पोहोचली आहे. आतापर्यंत ५ लाख २५ हजार २२३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना संकट सुरू झाल्यापासून देशात आतापर्यंत एकूण ४ कोटी २८ लाख ९१ हजार ९३३ रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. तसेच लसीकरणाचा आकडा १९८ कोटींच्या जवळपास पोहोचला असून, देशात आतापर्यंत १९७ कोटी ९८ लाख २१ हजार १९७ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात सोमवारी कोरोनाच्या १ हजार ५१५ नव्या रुग्णांची भर पडली. तर दिवसभरात एकूण २ हजार ०६२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आणि ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.