पुणे – राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणहून झाडे उन्मळून पडण्याच्या, घरे कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. नाशिक जिल्ह्यात तर काल, मंगळवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस आणि वाऱ्याच्या वेगाने भले मोठे वाडे कोसळले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्याच्या काही भागांत सोमवारी रात्रभर पाऊस पडत होता, या पावसामुळे डिंगरअळी संभाजी चौक परिसरातील पवार वाडा मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कोसळला. या वाड्यात कोणीही वास्तव्यास नव्हते त्यामुळे तो बंदच होता. तर, दुसरीकडे चौक मंडई येथील काळेवाडा कोसळला. या वाड्याला लागून अनेक घरे आहेत. या घरांमध्ये लोक वास्तव्यास आहेत. मात्र वाडा विरुद्ध दिशेने कोसळल्याने मोठी हानी टळली. परंतु रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सोमवारी संध्याकाळी कोसळलेला कुंभकर्ण वाड्याचा आणखी काही धोकादायक भाग मंगळवारी सकाळी कोसळला. या सर्व घटनांमुळे अन्य धोकादायक वाड्यांतील रहिवाशांना वाडा सोडण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र रहिवासी ऐकण्यास तयार नसल्याने प्रशासनही त्यांच्यापुढे हतबल झाले आहे.
दरम्यान, आसराची वेस येथील धोकादायक कुलकर्णी वाड्याचा थोडा थोडा भाग कोसळत असल्याने पावसाचा वाढता जोर आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिका पश्चिम विभाग बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाड्याचा संपूर्ण धोकादायक भाग उतरवून घेतला.