नाशिक – शहरात यापूर्वी तयार करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. येथे जुलै महिन्याच्या १३ दिवसांत ५३९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. बुधवारी एकाच दिवसात ५६ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग पुन्हा सज्ज झाला आहे.
जुने नाशिक भागातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात सध्या चार कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. याव्यतिरिक्त इतर रुग्णालयांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. परंतु असे असले तरीही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालये, ठक्कर डोम, संभाजी स्टेडिअम, इत्यादी ठिकाणची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी याबाबत माहिती दिली.
दरम्यान, नाशिकमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत एक हजाराहून अधिक नागरिकांचा बळी गेला होता. तर दुसऱ्या लाटेत दीड लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले होते. त्यावेळी ३ हजार नागरिकांनी आपला जीव गमावला. त्यानंतर आलेल्या तिसऱ्या लाटेचा मात्र फारसा परिणाम जाणवला नाही. त्यामुळे व्यवहार पुन्हा सुरळीत झाले.