पणजी – अटल सेतू पुलावर वारंवार घडणारे अपघात लक्षात घेता काही दिवस अटल सेतू बंद ठेवावा, असे मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले होते. तसेच सध्या पर्यटकांची संख्या आणि रहदारीही कमी असल्याने येथे तज्ज्ञांमार्फत संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करावी.आवश्यक असल्यास दुरुस्ती करून पुन्हा अटल सेतू सुरू करावा, असे मत मंत्री खंवटे यांनी व्यक्त केले होते. या आरोपांनंतर आता सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे यांनी प्रत्यक्ष ‘अटल सेतू’वर जाऊन निकृष्ट कामाचे दर्शन घडवत संपूर्ण प्रकल्पाच्या दर्जावर शंका व्यक्त केली आहे. तसेच ही पैशाची उधळपट्टी असल्याचे आरोपही त्यांनी केले आहेत. त्यामुळे या सेतूचे बांधकाम वादात सापडले आहे. दरम्यान, सरकारच्या मदतीने राज्य सरकारने उभारलेल्या मांडवी नदीवरील ‘अटल सेतू’चे काम दिवसेंदिवस वादात सापडताना दिसत आहे. अटल सेतूवरील खड्डे ही तर आता नित्याचीच बाब झाली आहे. त्यातच फोंड्याकडे जाणार्या दुभाजकापासून पुढे उतरतीवर सातत्याने अपघात होत आहेत, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या प्रकल्पाची संपूर्ण चौकशी करावी आणि तोपर्यंत हा प्रकल्प बंद ठेवावा, असे आवाहन केले आहे.