नवी दिल्ली : नॅशनल एलिजिबिलिटी आणि एंट्रान्स परीक्षा २०२२ (NEET) शी संबंधित हॅशटॅग सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. ‘नीट’च्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना फार कमी वेळ मिळणार आहे म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी सुरु आहे. याशिवाय नीटचे विद्यार्थी या मागणीसाठी थेट ‘पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी चला’ अशा प्रकारचे ट्विटर हॅशटॅग वापरुन पोस्ट व्हायरल करत आहेत.
नीट २०२२ साठी १८.७२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विद्यार्थी नीट परीक्षेच्या वेळापत्रकाला ऑनलाइन विरोध करत असून त्यांनी अनेक ऑनलाइन मोहिमा सुरू केल्या आहेत आणि गेल्या काही महिन्यांपासून मंत्र्यांना पत्रे लिहिली आहेत. परीक्षा पुढे ढकलण्यासाठी NEET उमेदवारांचं ‘चलो मोदी आवास’ #NEETUGChaloMODIJIAwas हे ट्विटर हॅशटॅग्स सोशलमिडियावर ट्रेंड होत आहे.पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात अशी नीट परीक्षार्थींची इच्छा असून पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढण्याचा दावा ते करत आहेत.