कोलकाता- कोलकाता पोलिसांनी काल प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे.
कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, नुपूर शर्मा चौकशीसाठी दोन नोटीस पाठवूनही हजर झाल्या नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. शर्मा यांच्याविरोधात आतापर्यंत ही पहिली लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. यापूर्वी, कोलकाता पोलिसांच्या पूर्व उपनगरी विभागातील नरकेलडांगा पोलीस स्टेशनने नुपूर शर्माला 20 जून रोजी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्यानंतर, उत्तर आणि उत्तर उपनगर विभागाच्या अॅमहर्स्ट स्ट्रीट पोलीस स्टेशनने तिला 25 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले. दोन्ही वेळा नुपूर शर्माने कोलकाता पोलिसांना ई-मेल पाठवून सांगितले की, तिला हजर होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल आणि तिने येण्यास असमर्थता व्यक्त केली. कोलकात्यात आल्यास तिची सुरक्षा धोक्यात येईल, असेही तिने म्हटले होते.