पुणे – क्रूझवरील संपूर्ण कारवाई दरम्यान समीर वानखेडेंसोबत असणारा साक्षीदार आणि आर्यन खानसोबत सेल्फी काढल्यामुळे चर्चेत आलेल्या किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्याखाली आज सकाळी अटक केली आहे. गोसावी याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या दोन टीम त्याच्या मागावर उत्तर प्रदेश, लखनौ या ठिकाणी गेल्या होत्या. मात्र काल तो पुणे परिसरात फिरत होता. पत्रकारांना फोन वरून बाईट द्यायचा आणि त्यानंतर फोन बंद करून बसायचा. सचिन पाटील या बोगस नावाने तो वावरत होता. अखेर त्याला पुण्यातील कात्रज परिसरातील एका लॉजमधून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
नोकरी मिलावून देतो असे आमिष दाखवून त्याने अनेक लोकांना गंडा घातला आहे. त्याच्या विरुद्ध ठाणे, मुंबईतील अंधेरी तसेच पालघर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल आहेत. २०१८ मध्ये कसबा पेठ परिसरात राहणारा चिन्मय देशमुख हा नोकरीच्या शोधत होता. त्यावेळी त्याची किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांच्या सोबत ऑनलाईन ओळख झाली. या दोघांनी चिन्मयला मलेशियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावतो असे सांगितले. त्यावर त्याच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यानुसार चिन्मयने तीन लाख रुपये दिले. मात्र तरी देखील नोकरी बाबत काही सांगितले गेले नाही. त्यावर अखेर त्यांनी फसवणुक झाल्याची तक्रार केल्यानंतर किरण गोसावी याच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात २०१८ साली फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या विरोधात २०१९ रोजी त्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते आणि त्याला फरार घोषित करण्यात आले होते.
मात्र त्यानंतर मुंबईच्या समुद्रात क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीत आर्यन खानला घेऊन जाताना गोसावी सर्वप्रथम व्हिडीओत दिसून आला. तो या प्रकरणात नार्कोटिक्स क्राइम ब्युरोचा पंच होता.आर्यन ड्रग्ज पार्टीच्या तपासावर आरोप होऊ लागल्यानंतर गोसावी पुन्हा फरार झाला. पुणे पोलिस गोसावीच्या शोधात होते. दरम्यान, पोलिसांनी गोसावीविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली होती. त्यानंतर गोसावी लखनौ, उत्तरप्रदेशात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या दोन टीम त्याच्या मागावर होत्या. त्याने दोन वेळा पुणे पोलिसांना गुंगारा दिला होता. हैदराबाद, लखनऊ, फतेपूर सिक्री, जळगाव, लोणावळा अशा वेगवेगळ्या शहरांत तो फिरत होता. ‘सचिन पाटील’ या नावानं हॉटेल बुक करायचा. तो पुण्यात स्वत: हजर होणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे बुधवारी दिवसभर शिवाजीनगर कोर्ट परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला रात्री पकडले आहे.पोलीस चौकशीत त्याने आपण स्टॉप क्राईम ऑर्गनायझेशन या संस्थेचा तो सदस्य असून एका गुप्तहेर संस्थेचा सदस्य असल्याचे सांगितले आहे.इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयात निर्यातीचे काम किरण गोसावी करत होता,अशी प्राथमिक माहिती त्याने दिल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.