नवी दिल्ली – ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यामध्ये जोरदार टक्कर आहे. ब्रिटनमध्ये पंतप्रधान होण्याच्या अगदी जवळ असलेल्या ऋषी सुनक यांची घसरण होताना दिसत आहे आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांना दिग्गजांचा पाठिंबा मिळत असल्याने त्या ऋषी सुनक यांच्यापेक्षा वरचढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. ‘द टेलिग्राफ’च्या रिपोर्टनुसार, ब्रिटिश अर्थमंत्री नदिम झहावी यांनी लिझ ट्रस यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या पुढच्या नेत्या होण्यासाठी औपचारिक पाठिंबा दिला आहे.
बेटिंग एक्स्चेंज फर्म मार्केट्सच्या ताज्या अहवालानुसार, ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस या ब्रिटनच्या पुढील पंतप्रधान होण्याच्या अगदी जवळ आहेत आणि त्यांना ऋषी सुनक यांच्यावर 90 टक्के आघाडी मिळाली आहे. सर्वेक्षणानुसार, कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सुमारे 90 टक्के मतदारांचा असा विश्वास आहे की लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान होऊ शकतात. तर ऋषी सुनक पुढील पंतप्रधान होण्याची शक्यता केवळ 10 टक्क्यांवर आली आहे. ‘द टेलिग्राफ’च्या रिपोर्टनुसार नदिम झहावी यांनी लिझ ट्रस यांच्या समर्थनार्थ म्हटलं आहे की, ‘परराष्ट्र सचिव ट्रस जुन्या आर्थिक पुराणमतवादाला छेद देतील आणि आपली अर्थव्यवस्था पुराणमतवादी पद्धतीने चालवतील.’