नाशिक – गुरुवारी दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत असताना राज्याच्या अनेक भागांत सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नाशिकचा पारा घसरला असून २४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. या पहिल्या पावसामुळे नाशिककर सुखावले.
गेल्या काही दिवसांपासून नाशिककर उकाड्याने हैराण झालेले असताना हवेतील आर्द्रता वाढल्याने उकाड्यात आणखी भर पडली होती. अशातच काल सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास शहरासह उपनगरी भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. या पहिल्या पावसात अनेकांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. दरम्यान, येत्या काही दिवसात नाशिकचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे.