इस्लामाबाद- आंतर शहर क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने स्थानिक संघात निवड केली नाही. त्यामुळे निराश झालेल्या शोएब या तरुण जलदगती गोलंदाजाने आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे अत्यवस्थ असलेल्या शोएबला रुग्णालयात दाखल केले आहे.
पाकिस्तानच्या दक्षिण सिंध प्रांतातील हैदराबादमधील तरुण वेगवान गोलंदाज शोएबचा मंडळाने स्थानिक संघात समावेश केला नाही. त्यामुळे निराश झालेल्या शोएबने मंगळवारी मनगटाची रक्तवाहिनी कापली. घरातील बाथरूममध्ये तो अत्यावस्थ आणि बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली नाही म्हणून मोहम्मद जारयाब या क्रिकेटपटूने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर घडलेली ही दुसरी घटना आहे.