नवी दिल्ली – पाकिस्तानची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत चालली आहे. परिणामी जनतेचे हाल होत आहेत. त्यातच आधीच महागलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर आता पुन्हा एकदा वाढले आहेत. एकाच झटक्यात डिझेलच्या दरात ५९.६१ रुपयांनी, तर पेट्रोलच्या दरातही २४.०३ रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत २३३.८९ रुपयांवर पोहोचली आहे.
पाकिस्तानचे पेट्रोलियम राज्यमंत्री मुसाद मलिक यांनी डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींबाबत मागील सरकारच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले की, इम्रान सरकारने पाकिस्तानची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. ते पुढे म्हणाले की, इम्रान खान यांनी सबसिडी देऊन जाणूनबुजून पेट्रोलच्या किंमती कमी केल्या होत्या आणि त्यामुळेच शाहबाज सरकारला त्या निर्णयांचा फटका बसत आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, मे महिन्यात सरकारला पेट्रोलियम उत्पादनांवर १२० अब्ज रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे, जे नागरिक, सरकारच्या खर्चापेक्षा तिप्पट आहे.