इस्लामाबाद- पाकिस्तानात मुसळधार पावसाचे तांडव सुरू आहे. त्यात गुरुवारी लाहोरला मुसळधार पावसाने झोडपले. अवघ्या ७ तासांत शहरात २३८ मिमी पावसाची नोंद झाली. त्याने २० वर्षांचा विक्रम मोडला. ढगफुटी सदृश्य पावसामुळे लाहोर जलमय झाले. नागरी सेवा आणि जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे पाकिस्तानात मोठी जीवितहानी होत आहे. पावसाने आतापर्यंत २८२ जणांचे बळी घेतल्याची नोंद झाली आहे, असे ‘डॉन’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.
यंदा पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. गुरुवारी लाहोर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. सलग ७ तास पडलेल्या पावसामुळे येथील वीजपुरवठा खंडित झाला. रस्त्यांना नदी, नाल्याचे स्वरूप आल्यामुळे वाहतूक बंद पडली. विजेच्या तारा तुटल्यामुळे व खांब कोसळल्यामुळे शहराचा अर्धाधिक भाग अंधारात बुडाला. पावसामुळे घरे आणि शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांची उभी पिके सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे भुईसपाट झाली. अनेक रस्ते आणि पूल महापुराच्या पाण्यात बुडाले. या सर्व प्रकारामुळे लाहोरचे जनजीवन विस्कळीत झाले. यंदाच्या पावसाळ्यात महिनाभरात २८२ जणांचे बळी गेले. याशिवाय २११ पेक्षा अधिक लोक जखमी झाले, अशी माहिती पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली.