इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर शाहबाज सरकारने रात्री दहानंतर लग्न समारंभांवर बंदी घातली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीस काल, बुधवारपासून इस्लामाबाद येथे सुरुवात झाली. स्थानिक माध्यमांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सूचनेनुसार ही बंदी लागू केल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानमधील आर्थिक संकटानंतर आता तिथे वीज संकटही गडद झाले आहे. पाकिस्तानने विजेचा वापर कमी करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. रात्री दहानंतर लग्न समारंभाच्या बंदीनंतर भविष्यात रात्री साडे आठनंतर देशभरातील बाजारपेठा बंद ठेवण्याचादेखील निर्णय हाेऊ शकताे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ऊर्जा मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी माध्यमांना माहिती देताना बाजार लवकर बंद करणे आणि घरातून काम केल्याने विजेची बचत होऊ शक,ते असे नमूद केले. ते म्हणाले, देशात वीज निर्मिती २२ हजार मेगावॅट आहे आणि गरज २६ हजार मेगावॅटची आहे. त्यामुळे चार हजार मेगावॅटची कमतरता भासत आहे. विजेचे संकट दूर करण्यासाठी काही कठाेर निर्णय घ्यावे लागत आहेत, असेही मंत्री दस्तगीर यांनी म्हटले आहे.