हैदराबाद – पावसाळी वातावरणात घरोघरी तब्येतीच्या काही ना काही कुरबुरी सुरू असल्याचे दिसते. त्यापैकी ‘टायफॉइड’ हा एक सामान्य आजार आहे, ज्यावर वेळीच उपचार न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तेलंगणातील आरोग्य खात्याचे संचालक डॉ. श्रीनिवास राव यांनी तर या आजाराला चक्क पाणीपुरी जबाबदार असल्याचे म्हणत त्याला ‘पाणीपुरी रोग’ असे नाव दिले आहे. तसेच सर्व पाणीपुरी विक्रेत्यांना स्वच्छता राखण्याची आणि शुद्ध पाणी वापरण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.
तेलंगणात गेल्या काही दिवसांपासून टायफॉईडच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. येथे आतापर्यंत २,७५२ जणांना दूषित पाणी प्यायल्याने टायफॉइडची लागण झाली आहे. तसेच कॉलरा आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ होतेय. यावर सरकारने नागरिकांना पावसाळ्यात उघड्यावरील पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
सुरुवातीच्या काळात ताप, पोटदुखी, डोकेदुखी, जुलाब, भूक न लागणे ही टायफॉईडची लक्षणे दिसून येतात. त्यावर वेळीच उपचार न केल्यास लक्षणे आणखी वाढतात. मग रक्ताच्या उलट्या, अंतर्गत रक्तस्त्राव, त्वचा पिवळी पडणे या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे हा आजार आपल्या अवतीभोवती फिरकूही नये यासाठी काळजी घेणे, स्वच्छता राखणे आवश्यक आहे. हीच बाब तेलंगणा सरकारने नागरिकांना सांगितली आहे. दरम्यान, तेलंगणामध्ये यंदाचा पावसाळा सुरू झाल्यापासून जुलाब झालेल्या ६ हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.