कोलकाता- पश्चिम बंगालमधील शाळा भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पार्थ चॅटर्जी यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रीपदावरून हटवले आहे. ईडीच्या अटकेनंतर पार्थ चॅटर्जी यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी होत होती. आज ममता बॅनर्जी यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर काही वेळातच चटर्जी यांना मंत्रिपदावरून हटवण्याचे आदेश जारी करण्यात आले.
पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये ममता बनर्जी यांच्या सरकारमधील उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक करण्यात आली आहे.
त्यानंतर पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीअर्पितामुखर्जी यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. अर्पिताच्या घरी कोट्यावधींचे घबाड सापडले असून नोटा मोजण्यासाठी ह्या ठिकाणी अनेक मशीन मागवाव्या लागल्या होत्या. सापडलेल्या नोटा भरून नेण्यासाठी चक्क कंटेनरही आणण्यात आला होता.उत्तर कोलकाताच्या बेलघरिया परिसरातील फ्लॅटमध्ये ही रक्कम मिळाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फ्लॅटमधील प्रत्येक अलमारीमध्ये नोटांचे बंडल होते. तर क्लब टाऊन हाऊसच्या फ्लॅटमधून 5 किलो सोने आणि चांदीचे शिक्के, तसेच सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. 18 तास चाललेल्या या रेडनंतर ईडीचे अधिकारी अर्पिता मुखर्जीच्या फ्लॅटमधून निघाले. एकूण 10 बॉक्समध्ये ही रक्कम एका ट्रकमधून ईडीचे अधिकारी घेऊन गेले आहेत.यापूर्वी 22 जुलै रोजी ईडीने पहिल्या छापेमारीत अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून 21 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. ईडी कारवाईनंतर घरात सापडलेले पैसे हे पार्थ चॅटर्जी यांचेच असल्याची कबुली अर्पिता मुखर्जीने दिली आहे. पैसे ठेवलेल्या खोलीमध्ये मला जाण्याची परवानगी नव्हती, असेही तिने ईडी चौकशीत म्हटले आहे.