मुंबई – शाळा सुरू होताच पालकांना महागाईचा आणखी एक झटका मिळाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत स्कूल बसच्या दरात वाढ केल्याने पालकांसाठी हा मोठा फटका आहे. एकीकडे खासगी शाळा व्यवस्थापन यामागे डिझेल-पेट्रोल महाग असल्याचे देत आहे, तर दुसरीकडे पालक याला शाळांची मनमानी सुरू असल्याचे म्हणत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शालेय विद्यार्थ्यांच्या स्कूल बस चालकांनी स्कूल बसच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, स्कूल बसच्या शुल्कात २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या महागाईचा सामना करणाऱ्या पालकांना दरवाढीचा आणखी एक फटका बसला आहे. मात्र इंधन दरवाढीमुळे मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली असून त्याचा फटका स्कूल बस चालकांना बसला आहे. कोरोना महासाथीच्या काळात दोन वर्ष स्कूल बस या वाहतुकीशिवाय उभ्या होत्या. या दरम्यानचा देखभाल खर्चदेखील मोठा होता, असे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले. तर एप्रिल महिन्यातच आम्ही स्कूल बसच्या शुल्कात ३० टक्क्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेणार होतो. मात्र, पालकांची अडचण होऊ नये यासाठी ही दरवाढ २० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. स्कूल बस ओनर्स असोसिएशनशी संबंधित असलेल्या स्कूल बस चालकांकडून १८०० रुपये प्रति विद्यार्थी शुल्क आकारले जाते. साधारणपणे मोठ्या बसमध्ये ४० विद्यार्थ्यांची आसन क्षमता असते. स्कूल बससाठी शासनाचे कठोर नियम असतात. त्यांची अंमलबजावणी करावी लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु पालकांकडून मात्र यावर नाराजीचा सूर येत असून वाढत्या महागाईच्या झळा शिक्षण क्षेत्रालाच अधिक जाणवत असल्याचे मत काही पालकांनी स्पष्ट केले आहे. तसेच यंदा विद्यार्थ्यांचा गणवेश, शालेय पुस्तके, वही व इतर खर्चात महागाईमुळे झालेली मोठी वाढदेखील पालकांना सहन करावी लागत असल्याची नाराजी पालकांकडून व्यक्त केली जात आहे.